या व्यक्तीमुळे शिवसेना पोहचली घराघरात आणि गावागावात… 0

एका सामान्य घरात जन्मलेला एक तरुण घर चालवण्यासाठी कधी दुध टाकायचा तर कधी पेपर टाकायचा पण लोकांच्या मदतीला जात असे लोकांना मदत करत गेला त्यातून मोठा मित्र परिवार जमला.वयाच्या २३ वी मध्ये जय अंबे नावाने मंडळ काढून लोकांची सेवा केली नंतर शिवसेनेत प्रवेश करून १०० टक्के समाजकारण हाच वसा त्याने घेतला आणि दिला त्यातून शिवसेना हा पक्ष वाढला. कार्यकर्त्याच्या घरातील राशनवर पण आनंद दिघे यांचे लक्ष असायचे त्यामुळे त्यांच्या साठी जीव देणारे अनेक कार्यकर्ते तयार झाले.मुस्लीम किंवा हिंदू असा भेद नाही कोणीच कोणावर अन्याय करायचा नाही आणि अन्याय ज्यांनी केला तो कोणीही असो त्याला सोडायचे नाही.

‘शिवसेनेचे ठाणे-ठाण्याची शिवसेना’ असा नारा देत गेल्या ४५ वर्षांपासून सर्वार्थाने ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला.ठाणेकरांनी शिवसेनेला भरभरून दिले आणि त्यामुळेच ‘शिवसेनेचे ठाणे’अशी या शहराची राजकीय ओळख निर्माण झाली.१९६७ मध्ये वसंतराव मराठे यांच्या रूपाने शिवसेनेला ठाण्याने पहिला नगराध्यक्ष दिला. शिवसेनेच्या राजकीय वाटचालीत हे पहिले आणि तितकेच महत्त्वाचे यश होते. साहजिकच तेव्हापासून गेली चार दशके या शहरावर शिवसेनेची एकहाती हुकूमत राहिली आहे. आनंद दिघे म्हणजे तर शिवसेनेचा ढाण्या वाघच. आनंद दिघे हे जिल्ह्य़ातील राजकीय वाटचालीत एकमेव असे निर्विवाद नेतृत्व मानले गेले. आनंद दिघे यांच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या ठाणेकरांनी सलग १९ वर्षे महापालिका शिवसेनेच्या ताब्यात ठेवली.

स्वर्गीय दिघे यांचेही ठाणेकरांशी जिव्हाळयाचे नाते होते. शहरातला टेंभी नाका हा केवळ शिवसैनिकांसाठी नाही, तर सर्वसामान्य ठाणेकरांसाठीही न्यायमंदिर होते. दिघे यांच्या कार्यपद्धतीविषयी कदाचित वेगवेगळे मतप्रवाह असतीलही, परंतु या शहरावर दिघेंची हुकूमत निर्विवाद होती, हे कुणालाही नाकारता येणार नाही. ठाणे आणि शिवसेना यांच्यामधील हा दुवा एकप्रकारची ऐतिहासिक ठेव मानली पाहिजे. जोवर आनंद दिघे होते तोवर शिवसेनेपेक्षा दिघे यांच्यावर विश्वास ठेवून आणि दिघेंच्या पश्चात त्यांच्या कार्याची पोहोचपावती म्हणून ठाणेकरांनी शिवसेनेच्या पारडय़ात मतांचे भरभरून दान घातलेय. १९८९ मध्ये आनंद दिघे यांनी ठाण्याला मुंबईतील बेस्टच्या धर्तीवर उत्तम सार्वजनिक व्यवस्था मिळावी म्हणून ‘टीएमटी’ परिवहन सेवा सुरू केली. स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र निर्णयक्षमता परिवहनला दिला. सामाजिक एकोपा, जनजागृती आणि प्रबोधन असे व्यापक उध्दीष्ठ डोळ्यासमोर ठेवून मा.धर्मवीर श्रीमंत श्री. आनंद दिघे साहेब यांनी टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवास प्रारंभ केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव चालू राहिला व अल्पावधितच तो भक्तांचे श्रध्दास्थान म्हणून गणला जावु लागला. आज ही त्यांनी घालुन दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करीत या उत्सवाची यशस्वी वाटचाल सुरु आहे.

ठाणे जिल्हय़ात ९०च्या दशकात शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी केले. दिघे यांच्या कार्यपद्धतीवर लोकशाहीवर प्रेम करणारा माणूस विश्वास ठेवेलच याची शाश्वती नाही. पण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना थेट मोखाड्याच्या पाड्यापर्यंत पोहोचवण्याचे काम दिघे यांनी यथाशक्ती केले. रिक्षाचालक असणारे एकनाथ शिंदे हे सर्व काही पाहत होते. रिक्षा चालवता चालवता ते विजू नाटेकर रिक्षा युनियनमध्ये सक्रिय झाले. याच दरम्यान किसननगर येथे शिवसेनेचे काम त्यांनी सुरू केले. हळूहळू शाखाप्रमुख म्हणून शिंदे यांचा शिवसेनेत वावर वाढला. दिघे यांच्या नजरेस शिंदे यांचे काम भरल्याने त्यांनी शिंदेंना महापालिकेच्या निवडणुकीत उभे केले. शिंदे निवडून आले. शिंदे हे २०००मध्ये सातारा येथे सहलीसाठी गेले असताना त्यांच्या दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाला. हे दु:ख शिंदे यांनी विसरण्यासाठी त्यांना दिघे यांनी महापालिकेत सभागृह नेतेपद बहाल केले, असे जुने जाणते शिवसेना कार्यकर्ते सांगतात. त्यानंतर त्यांच्या राजकारणाचा आलेख वाढतच राहिलेला आहे.

ठाणे व ठाणे जिल्हय़ावर, विशेषतः आनंद दिघेंवर बाळासाहेबांचे उदंड प्रेम.प्रत्येक निवडणुकीला शिवसेनाप्रमुख ठाण्यात यायचे. त्यांच्या सभा व्हायच्या, त्यांच्या भाषणाला तुफान गर्दी व्हायची. `मला ठाण्याची चिंता नाही. ठाणेकर माझे सगळे उमेदवार विजयी करतील, याची मला खात्री आहे. त्यामुळे मी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात एखादी सभा घेईन,’ अशा शब्दात ते ठाणेकरांवर विश्वास व्यक्त करत. `ठाणे जिल्हा माझा जिल्हा आहे. मी ज्या दगडाला शेंदूर फासेन, त्याला ठाणेकर विजयी करतील.’ याच विश्वासाच्या जोरावर त्यांनी बेलापूरमधील दिग्गज उमेदवार गणेश नाईक यांच्या विरोधात सीताराम भोईर यांना आमदारकीसाठी उभे केले. यावर आनंद दिघे यांनी सर्वस्व पणाला लावून गणेश नाईकांसमोर काहीशा नवख्या अशा सीताराम भोईर यांना निवडून आणले. ठाण्याच्या विधानसभा मतदारसंघात चार भाग झाले तेव्हा ३ जागांवर शिवसेना निवडून आली. एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक आणि राजन विचारे असे तिघेजण आमदार झाले.

ज्यावेळी उद्धव व राज यांच्यात धुसफूस सुरू होती, तेव्हा आनंद दिघे अस्वस्थ होते. या दोन्ही भावात संघर्ष झाल्यास आपण हिमालयात जाऊ किंवा शिवसेना प्रमुखांजवळ जाऊन राहू. २६ ऑगस्ट २००१, रोजी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचा अपघाती मृत्यू झाल्याने अवघा महाराष्ट्र हळहळला होता. आनंद दिघे यांच्या मृत्यूपश्चात शिवसैनिकांच्या उद्रेकावेळी सुलोचनादेवी सिंघानिया इस्पितळाला आग लावण्यात आली होती. या आगीत हे संपूर्ण इस्पितळ आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. त्यामुळे गेली आठ वर्षे तेथे इस्पितळाच्या इमारतीचा सापळा उभा होता. आनंद दिघे यांच्या मृत्यूबद्दल आज हि शिवसैनिकांच्या मनात एक शंका आहे.

२७ जानेवारी हा आनंद दिघे यांचा जन्मदिन. बाळासाहेबांनी दिघे यांच्यावर पुत्रवत प्रेम केले. बाळासाहेब आणि दिघे या दोन नेत्यांमधील असलेले विश्वासाचे नाते शेवटपर्यंत टिकून होते. दिघे शिवसेनेच्या वाटचालीतील अनेक घटनांचे साक्षीदार होते. धगधगती मशाल होती. गुंडगिरीबरोबरच समांतर सरकार राबवीत असल्याचा आरोप त्यांच्यावर नेहमीच झाला. त्यांची निष्ठा होती ती शिवसेनाप्रमुखांवर आणि शिवसेनेवर. मुक्त हस्ते मदत हाच त्यांचा धर्म होता. त्यांच्या “दरबारा’त म्हणूनच साधुसंताबरोबरच मुल्ला-मौलवी, पाद्रीही दिसत. चार खासदार, आठ-दहा आमदार निवडून आणण्याची ताकद ज्या माणसाकडे होती, ते दिघे आमदारच काय मंत्रीही झाले असते; परंतु आयुष्यभर शिवसेनाप्रमुखांप्रमाणे एकच पद घेऊन शिवसेनेत जगले. ते पद होते “शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख”.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *